नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडता पंजाबनंतर आता उडतं नाशिक, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे वक्तव्य केले. तसेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचेही ते म्हणाले होते. यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, महायुतीचे सरकार आल्यानंतर आताच संजय राऊतांना उडता महाराष्ट्र आणि उडता नाशिक आठवला आहे. जसं काही यांच्या महाविकास आघाडीच्या कालावधीत सगळेच ड्रग्ज माफिया जेलमध्ये होते. कुठेच ड्रग्जसंबंधी काहीच होत नव्हतं. अमली पदार्थांबद्दल तर महाविकास आघाडीने फारच कडक भूमिका घेतली होती, असा टोला नितेश राणेंनी राऊतांना लगावला आहे.
तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उगाच टीका केली असल्याचेही ते म्हणाले आहेत. या संजय राऊतला मी आठवण करुन देतो की, महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यानंतर असंख्य असे ड्रग्ज माफिया आहेत, राज्यात अनधिकृतपणे राहणारे असंख्य रोहिंगे आणि बांग्लादेशी आहेत ज्यांना वठणीवर आणण्याचे काम आमच्या गृहमंत्री साहेबांनी केलेलं आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, तुझ्यासारखे चारसो बीस कामगारांकडून खिचडी चोरी करतात आणि आपल्या कुटुंबियांच्या अकाऊंटमध्ये वाटतात. तुझा मालक आणि मालकाचा मुलगा महाराष्ट्रात अमली पदार्थाचा बादशहा आहे असं आम्ही ऐकलं आहे. त्या सगळ्यांना वठणीवर आणण्याचं काम आमच्या देवेंद्रजींनी केलेलं आहे, असेही राणे म्हणाले आहेत.
त्यामुळे तुला ड्रग्ज माफियांबद्दल मोर्चाच काढायचा असेल तर नाशिकमध्ये काढू नकोस. एक मोर्चा मातोश्रीवर काढ आणि दुसरा मोर्चा डीनोच्या बांद्र्याच्या घरावर काढ. कारण तुझ्या मालकाचा मुलगा कुठला फराळ खाण्यासाठी तिथे मंत्री म्हणून संध्याकाळी साडे सातनंतर जाऊन बसायचा याचा मेनू जर मी जाहीर केला तर तुला कळेल की अडीच वर्षात उडता महाराष्ट्र कोणी केला होता. कोण काय मस्ती करायचं ही सगळी माहिती आम्ही देऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत.
नितेश राणे आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले की, ड्रग्ज आणि अमली पदार्थ या विषयांमध्ये तुझ्या मालकाच्या मुलाने पीएचडी केली आहे. कधीतरी त्या कर्जतच्या फार्महाऊसवर जाऊन बघ. तुझ्या मालकाच्या मुलाने तिथल्या फ्रीजमध्ये काय काय ठेवलेलं आहे. चुकून तिथे धाड पडली तर आयुष्यभर टिकेल एवढा साठा मिळेल. म्हणून उगाच ड्रग्जबाबतीत आमच्या सरकारवर टीका करु नकोस, असा टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे.
तसेच तुझ्या मालकाचा मुलगा डीनोच्या घरी बसून काय काय उडवायचा आणि उडता महाराष्ट्राचा किती तास पिक्चर पहायचा याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. तुला पाहिजे असेल तर तुझ्या मालकाच्या मुलाची प्रमुख भुमिका असलेला उडता महाराष्ट्राचा चित्रपट आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित करु, असेही त्यांनी सांगितले.