मोलगीत बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळेठोक आंदोलन

अक्कलकुवा : मोलगी उपविभागांतर्गत साकलीउमर ते सरी रस्त्यावर खालपाडा येथे सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम माती मिश्रित रेती व दगड गोटे टाकून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की,  मोलगी उपविभागांतर्गत साकलीउमर ते सरी रस्त्यावर खालपाडा येथे सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम माती मिश्रित रेती व दगड गोटे टाकून निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबतची तक्रार काँग्रेस कमिटी मार्फत करण्यात आलेली होती. मात्र, कार्यकारी अभियंता शहादा यांना तक्रारी निवेदन देऊन देखील संबंधित अभियंता यांनी या ठिकाणी भेटी दिली नसून ठेकेदार मनमानी व दादागिरी करीत गावकऱ्यांवर दबाव आणत आहे.

सदर कामावर माहिती फलक नसल्याने कुठल्या निधीचे आणि किती अंदाजित किमतीचे काम आहे हे देखील लक्षात येत नाही. मोलगी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग या कार्यालयात एखादा लिपिक सोडला तर कुणीही अभियंता, उपअभियंता उपस्थित नसतो. त्यामुळे या दुर्गम भागात कोणाचे लक्ष नाही. कार्यकारी अभियंता शहादा यांना लेखी निवेदन देऊन तीन आठवडे उलटले असून देखील काही कारवाई करण्यात आलेली नाही. यावेळी जि.प.सदस्य सी.के.पाडवी, कॉंग्रेस पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष सिताराम राऊत, जितेंद्र पाडवी, मुन्ना पाडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.