नागपूर : नागपुरात रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांनी देशातील धार्मिक स्थिती आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयी सविस्तर भूमिका मांडली. भारतात लोकशाही असल्यामुळे राजकीय मतभेद. सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र, सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेत विसंवाद निर्माण होणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा, असा सल्लाही त्यांनी राजकीय नेतेमंडळींना यावेळी दिला.
मोहन भागवत म्हणाले की, कधीकाळी स्पेनपासून मंगोलियापर्यंत समस्त जगाला इस्लामी राजवटींच्या हल्ल्यांची भीती होती. पण हळूहळू लोक जागृत होऊ लागले, त्यांनी लढा दिला आणि आक्रमण करणार्यांना पराभूत केलं. यामुळे इस्लम त्यांच्या मूळ ठिकाणापुरताच मर्यादित झाला. आक्रमणकर्ते निघून गेले. आता भारतातला इस्लाम हा सर्वाधिक सुरक्षित आहे. हिंदू-मुस्लिमांमधलं हे शांततापूर्ण ऐक्य गेल्या कित्येक शतकांपासून इथे आहे.
काही संप्रदाय बाहेरून आले होते. त्यांना आणणार्या बाहेरच्या लोकांशी आपल्या लढाया झाल्या. पण आता ते बाहेरचे आक्रमक लोक निघून गेले आहेत. आता सगळे आतले लोक आहेत. त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांचे संबंध विसरून या देशात राहा. अजूनही जे लोक त्या बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, तेही बाहेरचे नसून आपलेच आहेत, असं समजून त्यांच्याशी आपण चांगलं वर्तन करायला हवं. जर त्यांच्या विचार करण्यात काही कमतरता आहे, तरक त्यांचं प्रबोधन करणं आपली जबाबदारी आहे, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.