मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, पार्थ पवार हे यांच्या आई महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात राजकीय नेते गुंतलेले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा प्रचार करण्यासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. कार्यकर्ते तसेच मतदारांच्या भेटीगाठी वाढल्याने पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
वाय प्लस सुरक्षा कुणाला दिली जाते?
मंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना वाय प्लस सुरक्षा देण्यात येते. या श्रेणीत १० सुरक्षा रक्षक तैनात असतात. यात दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्सचाही (पीएसओ) समावेश असतो. एक ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च येतो.