यंदाचा चिखलकाला उत्सव कुठे रंगला, विशेष काय होतं, तुम्हाला माहितेय का?

Muddy festival : जगाच्या नकाशावर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला सर्वांग सुंदर असा गोवा. त्या गोव्यातील नयनमनोहर समुद्र किनारे म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. तोच गोवा आता आध्यात्मिक व संस्कृती पर्यटनाला प्रेरणा देणारे पूरक कार्यक्रम व उत्सवांनी गाजतोय. फोंडा तालुक्यातील माशेल गावच्या चिखलकाला अशा वैशिष्ट्यपूर्ण उत्सवांपैकी एक. पर्यटन खात्याने या उत्सवात यंदा सहभाग घेत त्याची लोकप्रियता एका वेगळ्या उंचीवर नेली. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या सुपीक डोक्यातील कल्पना. मात्र, तिने पावसाळी पर्यटनाला एक नवा आयाम दिला आहे. कारण हा चिखलकाला आता पर्यटकांचेही  आकर्षण ठरणार आहे.

आषाढी एकादशीपासून माशेलच्या देवकीकृष्ण मंदिरात अखंड भजनी सप्ताहाने दरवर्षी या उत्सवाची सुरूवात होते. व्दादशीला मुख्य चिखलकाला देवळासमोरील मैदानावर खेळला जातो. तास दिड तास मुख्य असा चिखलकाला होत असला तरी यंदा या उत्सवाला राज्यस्तरावर नेण्याचा विडा पर्यटनमंत्र्यांनी उचलला अन् तो सत्त्यातही उतरवला. एकदा का एखादा विषय घेतला की, तो तडील नेईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत, त्याचाच हा एक नमुना.

जो चिखलकाला एरवी गावची शे दिडशे पुरूष मंडळी खेळायची, त्यात यंदा तब्बल पाचशे सातशेच्या आसपास राज्यभरातील लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मंदिरात देवदर्शन केल्यानंतर थळ श्री म्हणजे गावकरी जो तेल हातावर घालतो ते अंगाला चोळून मग मैदानावर चिखलात लोळण्याचा उत्सव म्हणजेच चिखलकाला.

यंदा राज्य पर्यटन खात्याने या उत्सवाची लोकप्रियता वाढविताना तो तीन दिवस साजरा केला. राज्यातील पारंपरिक सणोत्सवांना पर्यटनाच्या दृष्टीकोनातून उभारी देण्याची घोषणा खंवटे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच काही दिवसांनी केली होती. त्यास अनुसरून यंदा स्पिरीट ऑफ गोवा, वारसा महोत्सव असे उत्सव आयोजित करतानाच सांजाव व चिखलकाला सारख्या उत्सवांनाही त्यांच्या प्रयत्नांमुळे नवा आयाम मिळाला.

धो धो कोसळणारा पाऊस… मैदानावर झालेली चिखलाची दलदल… त्यात आबालवृध्दांनी मनसोक्त लोळणे म्हणजे कुणीतरी म्हणेल की, काय हा वेडेपणा. पण, होय या आगळ्यावेगळ्या उत्सवाला ४०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. गोव्याच्या अन्य काही भागातही चिखलकाला होत असला तरी माशेलचा हा चिखलकाला सर्वांचेच आकर्षण ठरू लागलाय.

यंदा या उत्सवाला राजाश्रय मिळाला. त्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दीही लाभली. उत्सवातील हौशी पुरूष मंडळीच्या उत्स्फूर्त सहभागाने यंदाचा चिखलकाला भलताच यशस्वी केला एवढेच नव्हे तर त्याची चर्चा वेगवेगळ्या सोशल मिडीयावरून होऊ लागली. पर्यटनमंत्री खंवटे यांच्या मते स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण अशा पारंपरीक सणोत्सवांना जर लोकप्रियता मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो तर गोव्याला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत भर पडेल.

भगवान श्री कृष्ण मातीत खेळायचे. त्यामुळे त्यांच्या विविध लीला या चिखलकाल्यात खेळल्या जातात. आंधळी कोशिंबीर, अंताक्षरी, घोडा गाडी, बेडूक उड्या, मनोरंजक चक्र, नवरा नवरी बनवून विवाह करणे असे विविध खेळ यावेळी खेळले जातात. काहीजण एखाद्याला उचलून नेत दलदलीत झोपवून चिखलात धडाधड पाय मारतात. जेणेकरून चिखल प्रत्येकाच्या सर्वांगावर उसळतो. त्याची मजा काही वेगळीच असते.

स्पेनमध्ये खेळल्या जाणार्या तोमातिनो उत्सवात लोक टॉमेटॉ फेकून मारतात. मात्र इथे चिखलात मनसोक्त लोळतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘देखो अपना देश’ची संकल्पना मांडली होती. चिखलकालोत्सवासारखे उत्सव राज्यातील पर्यटनाला वाव देणारे ठरतील यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे देखो अपना देश संकल्पना फळाला येईल हे देखील तितकेच खरे.

पर्यटनमंत्र्यांचे कौतुक, सोशल मिडीयावर असंख्य पोस्ट

पर्यटनमंत्री खंवटे यांनीही यंदा चिखलात उडी टाकली. त्यांच्यासोबत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे देखील दलदलीत लोळले. मंत्री या उत्सवात सहभागी होण्याची ही पहिलीच खेप होती. पारंपरिक उत्सवांना प्रोत्साहन देत त्याला जागतिक किर्तीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पर्यटनमंत्र्यांचे यावेळी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले. सोशल मिडीयावरून देखील मंत्री खंवटे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.