यंदाचा दसरा मेळावा कुणाचा, काय म्हटलंय मुंबई महापालिकेनं?

मुंबई : यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणी करणारे ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही मुंबई महानगरपालिकेला अर्ज दिले होते. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात कुणाची तोफ धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आपला अर्ज मागे घेणार, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला, असे बोलले जात होते.
पण मुंबई महापालिकेने मात्र अजुनही दोन्ही गटाचे अर्ज आमच्याजवळ असून याबाबत रविवार पर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षी ठाकरे गटाची सभा शिवाजी पार्कवर झाली होती. आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने हा अर्ज मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्याऐवजी आम्ही क्रॉस मैदान, आझाद मैदानासाठी पालिकेला अर्ज दिले आहेत, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.