बुलढाणा । गेल्या वर्षी राज्यातील बहुतांश ठिकाणी सरासरी पाऊस न झाल्यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल याची चिंता शेतकऱ्यांना आहेत. यातच बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमध्ये घट मांडणी करून यात पीक पाणी, पावसाचा अंदाज वर्तविला जातो. दरवर्षी ही भेंडवळची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. अखेर ही घटमांडणी आज शनिवारी (ता.11) सकाळी करण्यात आली. त्यात शेतकऱ्यांना दिलासादायक भाकीत आहे.
यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी करण्यात आली. पुंजाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेंडवळच्या घट मांडणीच निरीक्षण केलं. भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. मात्र, जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल तर सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातीचे दोन महिने सामान्य पाऊस राहणार असून, ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची वाट पाहतात.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात.
चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही यंदाची घट मांडणी करण्यात आली. यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आले. त्यानुसार यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, तर खरीप पिके साधारण राहतील. याशिवाय रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भेंडवळच्या भविष्यवाणीनसार, यंदा राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहणार आहेत. करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल. पिकांची नासाडी देखील होईल. रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगले राहील, असेही भाकित वर्तवण्यात आले आहे.