यंदा शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा कुणाचा?

मुंबई : गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. यातच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती. तर शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यात आला होता. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा चर्चेचा विषय ठरला होता.
हा सगळा प्रकार लक्षात घेता यावर्षी दोन्ही गटांकडून महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमनेसामने येणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटांनी महिनाभरापूर्वीच अर्ज केला असल्याने आता महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.