यादवने संजू सॅमसनची जर्सी का घातली? चर्चांना पूर्णविराम; जाणून घ्या काय आहे उत्तर ?

मुंबई : वर्ल्डकप 2023 च्या दृष्टीकोनातून भारताला प्रत्येक वनडे मालिका आता महत्त्वाची आहे. शितावरून भाताची परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच वर्ल्डकप संघात योग्य खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. त्या दृष्टीने भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्यात धरतीत लोळवून सुरुवात केली आहे.

या सामन्यात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली. दुसरीकडे, प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला जागा न मिळाल्याने चर्चा रंगली आहे. त्यात सूर्यकुमार यादव हा संजू सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरल्याने चर्चांना मोकळी वाट मिळाली.

सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी का घातली असावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर काही जण त्याला ट्रोल देखील करत आहेत. असं असताना सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी घालण्याचं खरं कारण समोर आलं आहे.

सूर्यकुमार यादव याला त्याच्या साइजची जर्सी मिळाली नव्हती. सूर्यकुमार यादव लार्ज साईजची जर्सी परिधान करतो. पण त्याला एक साईज छोटी जर्सी मिळाली. सूर्यकुमार यादवने याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केली. मात्र सामन्यापूर्वी जर्सी उपलब्ध नसल्याने संजू सॅमसनची जर्सी घालून सूर्यकुमार यादव मैदानात उतरल्याची माहिती आहे. त्यामुळे यादवने संजू सॅमसनची जर्सी का घातली? या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.