या बँकाची कर्जे घेतली असल्यास तुमच्या खिश्यावर पडणार अतिरिक्त भार

मुंबई : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. ज्याचा मोठा फटका बँकांच्या कर्जदारांना बसला आहे. ३० सप्टेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने आपले व्याजदर वाढीचेच धोरण कायम ठेवत ०.५ टक्यांनी व्याजदर वाढवले होते. त्यामुळे आता रेपो रेट ५.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा परिणाम म्हणून सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज ही सर्व कर्ज महागली आहेत.

भारतातील खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये ०.२० टक्क्यांची वाढ केली आहे. तर दुसरी प्रमुख बँक इंडियन बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये ०.३५ टक्क्यांची वाढ केली आहे. साधारणतः जून पासून या सर्व बँकांनी आपल्या व्याजदरांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे.