‘या’ भागांत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू, लाभ कसा घ्याल?

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांत मराठी भाषिक गावांतील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार सीमा भागातील नागरिकांसाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आले आहे. या योजनेंर्तग प्रति कुटुंब किंवा प्रति वर्ष १ लाख ५० हजार रकमेचे विमा सरंक्षण आणि मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतिवर्ष २ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम व ९९६ उपचारांचा लाभ मिळणार आहे. यासाठीच्या खर्चाची रक्कम विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या सर्वसाधारण या लेखाशिर्षांतर्गत राज्य शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगांव, कारवार, कलबुर्गी, विदर या मराठी भाषिक जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात ७०० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना ‘ आणि पॉलिक्लिनिकची केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यातील मुंबईत २६३ आरोग्य केंद्र सुरु करण्यात येतील. त्यासाठी शासनाने २१० कोटीस मान्यता दिली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र?
कर्नाटक राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली शिधापत्रिका.
आधार कार्डद्वारे व ते नसल्यास योजनेत मान्य असलेले १४ ओळखपत्र.
शिधापत्रिका व आधार कार्डद्वारे निवासाची खात्री केली जाईल.
स्व घोषणा पत्र आवश्यक राहील.