मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये काही जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीय. यातच उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीदेखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना येथून उमेदवारी देण्याची तयारी भाजपनं केली आहे.
दरम्यान, भाजपनं गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पण उत्तर मध्य मुंबईत भाजपनं अद्याप तरी उमेदवार दिलेला नाही. २०१४ पासून पूनम महाजन इथल्या खासदार आहेत. पण यंदा त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कालच (दि २५) या मतदारसंघासाठी काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपनं अद्याप तरी उमेदवार दिलेला नाही.
काँग्रेसनं उमेदवार जाहीर केल्यानंतर आज भाजपकडून निकम यांची उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते. उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत, त्यांची लोकप्रियता मोठी आहे. यामुळे भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपनं ८ ते १० दिवसांपूर्वी निकम यांच्याशी संपर्क साधला होता. उत्तर मध्यसाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजतं. आजच भाजपकडून निकम यांची उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.