मुंबई । तुम्हीही बँक पंजाब नॅशनल बँक(PNB) सह बँक ऑफ इंडिया बँकेचे खातेदार असाल आणि तुम्हीही या बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला झटका देणारी बातमी आहे. या दोन्ही बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लोन रेट म्हणजेच MCLR मध्ये 0.05 टक्के किंवा 5 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे कर्जाचा ईएमआय वाढला आहे.
पंजाब नॅशनल बँक(PNB)ने एक वर्षाच्या कालावधीसह ऑटो आणि वैयक्तिक कर्जाच्या किंमतीसाठी वापरल्या जाणाऱ्या MCLR 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के इतकी वाढ केली. याशिवाय तीन वर्षांचा MCLR देखील 5 बेस पॉईंटने वाढून 9.20 टक्के झाला आहे. इतर कालावधीसाठी, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचे MCLR दर 8.35-8.55 टक्के दरम्यान असतील. ओव्हरनाइट MCLR देखील 8.25 टक्क्यांवरून 8.30 टक्के करण्यात आला आहे. हे नवीन दर 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत.
याआधी आणखी एका सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियानेही एका वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 5 बेस पॉइंट्सने 8.95 टक्के वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्या बँकेतील सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. याचा अर्थ कर्जधारकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.
MCLR म्हणजे काय?
भारतातील व्यक्ती आणि व्यवसायांसाठी कर्ज घेण्याची किंमत ठरवण्यासाठी MCLR हा महत्त्वाचा घटक आहे. MCLR हा मूलत: बँक कर्जावर आकारू शकणारा किमान व्याज दर आहे. हा दर बँकेचा निधी खर्च, परिचालन खर्च आणि विशिष्ट नफ्याचे मार्जिन विचारात घेऊन ठरवले जाते.