यूपीएससी निकालात खान्देशचा डंका; तिघांनी मिळवले घवघवीत यश

जळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा (२०२३) चा निकाल आज  जाहिर झाला. खान्देशातील तिघांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रितेश बाविस्कर, नंदुरबार जिल्ह्यातील मयूर गिरासे आणि धुळे जिल्ह्यातील शुभम बेहेरे यांनी लोकसेवा परीक्षेत खान्देशाचे नाव लौकीक वाढविले.

जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील प्रितेश बाविस्कर यांनी देशभरात ७६७ रॅन्क घेऊन युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे प्रितेशच्या यशामध्ये त्याची आई उज्वला अशोक बाविस्कर व लहान बंधू संदेश अशोक बाविस्कर यांचा सिंहाचा वाटा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. आईच्या खंबीर पाठिंबामुळे व प्रतिकूल स्थितीतून आईच्या मेहनतीने प्रितेशने हे यश संपादन केले.

नंदुरबार जिल्ह्यातील कुंभारे ह.मु.दोंडाईचा येथील भरतसिंग पौलदसिंग गिरासे यांचे सुपुत्र मयूर भरतसिंग गिरासे यांनी देशभरात ४२२ घेऊन युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. तर धुळे जिल्ह्यातील प्रा. शरद बेहेरे यांचे सुपुत्र शुभम शरद बेहेरे यांनी देखील देशभरात 397 रॅक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहेत.