रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी सासर व माहेर मैदानात; ग्रामीण भागात सांभाळली प्रचाराची धुरा

रावेर : महायुतीच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आता मुलगी क्रिशिका व मुलगा गुरुनाथ आणि संपूर्ण माहेर मैदानात उतरले आहेत. कडक उन्हात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ग्रामीण भागात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. या प्रचारासाठी प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई येथे शिक्षण घेणारा मुलगा गुरुनाथ व नुकतीच १० वी परीक्षा दिलेली व वैद्यकीय शिक्षणासाठी तयारी करत असलेली मुलगी क्रिशिका गावोगावी प्रचारात सहभागी घेत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

रक्षा खडसे यांचे शहादा तालुक्यातील खेड येथील माहेरातील त्यांचे आई-वडील, मोठे भाऊ, वाहिनी, भाची व चुलत भाऊ प्रचारासाठी नुकतेच मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात दाखल झालेले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे हे प्रत्यक्ष प्रचारात सहभागी नसले तरी, अप्रत्यक्षपणे ते रात्रीपर्यंत हितचिंतकांच्या भेटी घेत आहे. खा. रक्षा खडसे यांच्यासाठी सासर व माहेर संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पहावयास मिळत आहे.