मुंबई : रशियाच्या महत्त्वाकांक्षी ‘लूना २५’ चांद्रयान क्रॅश झाले असून यान लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात भरकटले. त्यामुळे रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, रशियाने भारताकडे या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन केले होते. परंतु, रशियाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न आता भंगले आहे. त्यामुळे आता रशियाच्या अयशस्वी चांद्रमोहिमेनंतर भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेकडे संपूर्ण लक्ष असणार आहे. सध्या भारताचे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असून २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार आहे.
दरम्यान, रशियाचे यान हे कमी दिवसात चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते, तसेच, चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी तब्बल १ वर्ष मोहिम राबविण्याचा रशियाचा मानस होता. परंतु, यानाचे सॉफ्ट लँडिंग होण्याआधीच क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची चांद्रयान मोहिम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. रशियाच्या चांद्रयानाच्या क्रॅशमुळे भारताच्या चांद्रयानाच्या मोहिमेकडून मोठ्या कामगिरी अपेक्षा आहे.