पाटणा : रस्ता अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांनी रुग्णालयात न पाठवता थेट नदीत फेकून दिला. या अमानुष कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नागरिकांकडून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरच्या फाकुली भागात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ वर एक अपघात झाला. यात एका व्यक्तीला एका ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात न पाठवता आणि घटनेचा पंचनामा न करता थेट रस्त्यावरून उचलून नदीत फेकून दिला.
आजूबाजूला उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावरुन पोलिसांवर प्रचंड टीकाही होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. आधी मृतदेहाची विटंबना करून नंतर बाहेर काढण्याच्या पोलिसांच्या या कृत्याचाही व्हिडिओ बनवण्यात आला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नागरिकांकडून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून रस्त्यावर पडलेले अवशेष नदीत फेकून दिले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, व्हिडीओमध्ये पोलिसांनी मृतदेहाला नदीत फेकले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, तपासानंतर दोषी पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे जिल्ह्याच्या एसएसपींनी सांगितले आहे.