रस्ता नव्हे मृत्यूचा राष्ट्रीय महामार्ग : तीन वर्षात शंभरावर बळी

भुसावळ (गणेश वाघ) : रस्त्यांची वाहतूक वेगाने होण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चून महामार्गांचे एकीकडे जाळे विणले जात असताना दुसरीकडे हेच महामार्ग वाढत्या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे म्हणणे धाडसाचे ठरेल. राज्याचा आकडा पाहिल्यास प्रति दिन अपघातात 43 जणांचा मृत्यू ओढवतो तर कारवाईसाठी असलेल्या यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने बेफाम वाहनधारकांच्या वेगावर नियंत्रण राहत नसल्याने अपघात अधिकच घडतात. केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंढेंपासून अलीकडेच अपघातात ठार झालेल्या शिवसंग्रामचे नेते स्व.विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रस्ते अपघातांचा प्रश्न चर्चेत आला मात्र त्यानंतरही शासनाने रस्ते अपघातांबाबत ठोस धोरण न अलवंबल्याने अपघातांची मालिका कायम आहे. भुसावळ विभागाचा विचार केल्यास विभागातून केलेल्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन वर्षात 36 अपघातात तब्बल 106 वाहनधारकांचा बळी गेला आहे.

‘या’ कारणांमुळे अपघात होतात अधिक

राष्ट्रीय महामार्गामुळे वाहनधारकांच्या वेगावरील नियंत्रण सुटले आहे शिवाय पोलीस व आरटीओ यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने अति वेगात वाहने चालवण्याची स्पर्धा सुरू झाल्याने त्यामुळेदेखील अपघात वाढले आहे शिवाय दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसणे, मद्यपान करून वाहन चालविणे, लेन कटिंग, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, चालकाची पुरेशी झोप झाली नसणे तसेच पुरेसे प्रशिक्षीत वाहन चालक नसणे आदी कारणांसह काही अपघात हे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व अपूर्ण कामांमुळेदेखील झाले आहेत तर प्रति दिवस नव्याने दाखल होणारे वाहने व रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमणदेखील अपघाताला अनेकदा कारणीभूत ठरते तर प्रति दिन वाढणार्‍या लाखोंच्या वाहन संख्येमुळे प्रदूषण होवून त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

 

80 टक्के अपघात मानवी चुकांमुळेच

अपघात रोखण्यासाठी व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या हेतूने दरमहा रस्ता सुरक्षा समितीची बैठक होणे अपेक्षित या बैठकीला ‘लोकप्रतिनिधीं’कडून खो दिला जात असल्याचा आरोप आहे. रस्ते अपघातांपैकी साधारण 80 टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे दिसून येत असतानाही वाहनधारक फारसे या बाबत गंभीर नाहीत हेदेखील तितकेच खरे !

 

महामार्गावर वेग नियंत्रण गरजेचे

भुसावळ शहराला लागून गेलेल्या महामार्गामुळे दिवसभरात हजारो वाहने धावतात मात्र अलीकडे अनेक भागातील महामार्गावरील गतिरोधक हटवण्यात आल्याने वेग मर्यादेवर वाहनधारकांचे नियंत्रण नाही तसेच कारवाई करणारी पोलीस वा आरटीओ यंत्रणा असलीतरी ‘चिरीमिरी’ घेवून जागीच प्रकरणाचा निपटारा होत असल्याने वाहनधारकांना कायद्याची भीती उरलेली दिसून येत नाही. चांगल्या बदलांसाठी भीती असायलाच हवी व गरजवंतांना मदत करण्यासह चुकीच्या पद्धतीने वाहने चालवून इतरांचा बळी घेणार्‍यांवर कठोर कारवाई करणे अशा दोन्ही भूमिका आता पोलीस प्रशासनासह आरटीओ प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्‍यांचा डेटा त्यांच्या परवान्यांना जोडण्याची सुविधा राज्यात आता उपलब्ध झाल्याने यंत्रणेने कोणतीही हयगय न करता कठोर कारवाईला सुरूवात केल्यास निश्चितच अपघातांना ब्रेक लागणार आहे.

 

भुसावळ विभागात तीन वर्षात 106 जणांचा मृत्यू

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ विभागात 2020-2022 दरम्यान 42 अपघात झाले व त्यातील 36 अपघातांमध्ये एकूण 106 जणांचा बळी गेला. त्यात 2020 मध्ये 28 तर 2021 मध्ये 42 तर 2022 मध्ये 42 जणांचा मृत्यू ओढवला. ग्रामीण भागाऐवजी महामार्गावर अपघात होण्याची संख्या यात अधिक आहे.

 

महामार्गावर दररोज कारवाई : पोलीस उपअधीक्षक

महामार्गावर दररोज सीट बेल्ट न लावणार्‍या तसेच रस्ते वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनधारकांविरोधात पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. वाहनधारक वाहन वेगावर बंधन ठेवत नसल्याने सर्वाधिक अपघात महामार्गावर घडतात, असेही वाघचौरे म्हणाले.