रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उपद्रव, वाहतुकीला अडथळा; अखेर जप्तीची मोहीम

पाचोरा : येथील पालिकेच्या विशेष पथकातर्फे पालिका क्षेत्रातील रहदारीस अडथळा निर्माण करणारी मोकाट जनावरे पकडून जप्त करण्याची मोहिम २५ रोजीपासून हाती घेण्यात आली आहे. याबाबत नागरीकांनी तक्रार केली होती, त्याची दखल घेऊन पालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते व शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव दिवसा गणिक वाढत असल्याने अपघात होण्याचे प्रकार नित्याचे झाले होते. याबाबत नागरीकांनी तक्रार केली होती, त्याची दखल घेत, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका पथकातर्फे मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळी पाच वाजेपासून या मोहिमेला सुरवात होते. दिवसभर ज्या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर दिसल्यास जप्त करण्यात येत आहे. ही जनावरे कोल्हे येथील गोशाळेत रवाना केली जात आहेत. आजपर्यंत सुमारे दीडशे जनावरे गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत.

शहरातील नागरीकांनी आपल्या मालकीची जनावरे शहरात मोकाट न सोडता आपल्या खाजगी जागेत बांधून ठेवावीत. मोकाट जनावरे  रस्त्यावर दिसल्यास जप्त करण्यात येवून जनावरे मालकांवरही दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच जनावरे मालकांवर गरज भासल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल व जप्तीची कार्यवाही सतत पुढे सुरु राहणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले.