रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळीतून नेण्याची कसरत, सात किलोमीटरची पायपीट

मोलगी ता.अक्कलकुवा : अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरावस्था तर काही नदींवर पूल नाहीत. त्यामुळे येथील बांधवांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी पुरातून गर्भवती महिलेला रुग्णालयात नेल्याची घटना ताजी असतानाच धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा येथील गर्भवती महिलेला उदय नदीतील  पुराच्या पाण्यातून झोळीच्या साहाय्याने वाट काढत सात किलोमीटर पायपीट करीत रुग्णालयात नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शासन करोड रुपये खर्च करत असतांना आदिवासी बांधवांना अजून किती दिवस समस्यांचा सामना करावा लागेल हा प्रश्न मात्र अनुत्तीर्ण आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असतांना दुसरीकडे आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तर नदीवरील रस्त्यांवर पूल नाहीत तर कुठे आरोग्यवस्थेचा बोजवारा उडालेला अशी परिस्थिती आजही दिसून येत आहे.

धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा येथे राहणाऱ्या गंमलीबाई किसन पावरा (वय ३८) या महिलेला बुधवारी पोटात दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र धडगाव तालुक्यातील खुटवडा – कुडब्यापाडा ते बुन्नीपाडा या गावांना जोडणारा रस्ता नाही. त्यामुळे परिवाराच्या सदस्यांनी गर्भवती महिलेला झोळीच्या साहाय्याने नेत बुन्नीपाडा येथून कुडब्यापाडा मार्गे खुटवडा पर्यंत सात किलोमीटर पायपीट कसरत केली व तेथुन रस्त्यात येणाऱ्या उदय नदीतून वाट काढत प्रवास सुरू झाला. त्यानंतर तिला धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याठिकाणी गंमलीबाई प्रसूती झाल्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने येथील पाड्यापर्यंत आणले परंतु पुढे बुन्नीपाडा येथे जायला रस्ताच नसल्याने पुन्हा पुराच्या पाण्यातुन बांबूची झोळी करून जीवघेणा प्रवास करावा लागला. धडगाव तालुक्यापासून १७ कि.मी एवढे अंतर असून खुटवडा – कुडब्यापाडा एकूण ७.५ कि.मी. अंतर आहे गेल्या ४ वर्षा आधी या रस्त्याला मंजूरी मिळून सुद्धा रस्त्याच्या कामाची सुरुवात अद्यापही झाली नसून स्थानिक लोकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावा अशी मागणी पोलिस पाटील रतन बोला पावरा, सरपंच मिनाबाई संभाजी पावरा, उपसरपंच दारासिंग माक्या पावरा, विरसिंग पावरा, केशव पावरा, संभाजी पावरा, मेरसिंग पावरा व गावकऱ्यानी केली आहे.

मूलभूत सुविधांपासून वंचित
सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक गावापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे तेथे रुग्णवाहिका पोचू शकत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या, आरोग्य, शैक्षणिक समस्या अशा अनेक मूलभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
– मिनाबाई पावरा
सरपंच, खुटवडा,कुणब्यापाडा

बुंनीपाड्यात एकुण 614 कुटुंबे वास्तव्य करतात तर येथील लोकसंख्या 1 हजार 764 एवढी आहे. या पाड्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता व नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना धडगाव कडे जाण्यासाठी मोठ्या हाल अपेष्टा कराव्या लागतात.