राजकीय भूकंपाच्या चर्चेवर अजित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे पॉवरफुल नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतांना आता अजित पवार यांच्यासोबत ५३ पैकी ४० आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे. या चर्चेने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर अजित पवार यांनी खुद्द खुलासा केला आहे.

दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत असल्याची चर्चा सुरु असतांना अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे. नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार हे विधीमंडळातील आपल्या कार्यलयात पोहोचले आहेत. इथे ते गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच अनेक आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. तसंच दादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, असंही बनसोडे यांनी सांगितलं.