राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सीकरच्या फतेहपूर शेखावतीमध्ये गोंधळ उडाला आहे. बोचीवाल भवनामागील परिसरात दोन गटात झालेल्या तणावानंतर दगडफेकीची घटना घडल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे.
दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. दगडफेकीमुळे काही काळ मतदानावरही परिणाम झाला, मात्र काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. शांतता राखण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोचीवाल भवन मतदान केंद्रावर बनावट मतदानावरून दोन्ही पक्षांमध्ये पहिल्यांदा वाद सुरू झाला. यानंतर काँग्रेसचे उमेदवार हकम अली खान आणि अपक्ष उमेदवार मधुसूदन भिंडा यांचे समर्थक समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू होती. घटनास्थळावरून अनेकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांमध्ये तणावाची ही परिस्थिती का आणि कशी निर्माण झाली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.