मुंबई । राज्य सरकारने राज्यातील होमगार्ड्सचा दसरा गोड केला आहे. होमगार्ड्सच्या मानधनसह विविध भत्त्यांची रक्कम दुपट्टीने वाढविण्यात आल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच निर्णयाच्या अमंलबजावणीला सुरुवात झाली आहे. ही भत्तेवाढ दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.
नव्या निर्णयानुसार राज्यातील होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे.राज्यातील सुमारे ५५ हजार होमगार्ड्सना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एकूण 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती करण्यात आली आहे. सध्या या होमगार्ड्सना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सनाही नव्या निर्णयानुसारच मानधन मिळणार आहे. या होमगार्ड्स द दसऱ्याची एका प्रकारे भेटच मिळाली आहे.