तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। काल बाप्पाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. राज्यात गणरायाच्या आगमनाला पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. तर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासह राज्यभरात येणाऱ्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे राज्यभरात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. आज विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील तीन ते चार दिवसात राज्यात पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उद्यापासून पुण्यासह घाटमाथ्यावर तसेच इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.