जळगाव : पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच ‘नंबर वन’ असेल याच बरोबर खान्देशातही भाजपचा डंका वाजेल असा अंदाज न्यूज एरिनाने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्वेक्षण संस्थेने नुकताच विविध भागात जाऊन केलेले सर्वेक्षण ट्यूटर तसेच विविध माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याने राजकीय क्षेत्रात बुधवारी एकच चर्चा सुरू होती. विविध पक्षांचे कार्यकर्ते याच विषयावर बोलतांना दिसत होते.
पुढील वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात विधान सभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूका बरोबर होतील यासह विविध अंदाज राजकीय क्षेत्रात चर्चीले जात असतानाच सर्वेक्षणाचा हा अहवाल चर्चेचा विषय ठरला आहे.
उत्तर महाराष्ट्रात मुसंडी
यासह मराठवाडा, व उत्तर महाराष्ट्रातही भाजपचाच डंका असेल. उत्तर महाराष्ट्र/खान्देशातही भाजप मुसंडी मारेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 47 जागा आहेत. त्यात सर्वाधिक 23 भाजप, शिवसेना 3, उबाठा गट शून्य, काँग्रेस 6, राष्ट्रवादी काँग्रेस 14 व अन्य एक अशी स्थिती असेल असा अंदाज आहे.
नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा व नवापूर काँग्रेसकडे असेल तर शहादा व नंदुरबार जिल्ह्यात भाजप आघाडी घेईल.
धुळे जिल्हा
या जिल्ह्यातील पाच मतदार संघांपैकी साक्री, धुळे शहर व ग्रामीण, शिंदखेडा व शिरपूर या पाचही मतदार संघात भाजपच आघाडी घेईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा
या जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघांपैकी सहा ठिकाणी भाजप, दोन ठिकाणी शिवसेना, व तीन जागांवर राष्ट्रवादी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात चोपडा (एसटी)(राष्ट्रवादी), रावेर – भाजप, भुसावळ (एससी)-बीजेपी, जळगाव शहर-भाजप, जळगाव ग्रामीण शिवसेना, अमळनेर -भाजप, एरंडोल – शिवसेना, चाळीसगाव -बीजेपी, पाचोरा -राष्ट्रवादी, जामनेर-भाजप तर मुक्ताईनगर मतदार संघ या अहवालानुसार राष्ट्रवादीकडे जाईल असा अंदाज आहे.
सर्वेक्षण करणार्या संस्थेच्या प्रतिनिधींनी विविध विभागात जाऊन नागरिकांची मते जाणून घेत हा अहवाल तयार केला आहे. मात्र प्रसिद्ध अहवाल विविध माध्यमांवर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
असे असेल राज्यातील चित्र
सर्वेक्षणानुसार राज्यात सर्वाधिक जागा मिळवून ‘भाजप नंबर एक’चा पक्ष असेल. यात भाजपला 123 ते 129 जागा, शिवसेना 25, राष्ट्रवादी 55-56, राष्ट्रीय काँग्रेस 50 ते 53 शिवसेना (उबाठा) 17 ते 19 व अन्य 12 जागा मिळतील असा या सर्वेक्षणातील अंदाज आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात भाजप आघाडी मिळवेल, असा अंदाजही यात व्यक्त करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कोकण, मुंबई प्रदेश, ठाणे व मराठवाडा, विदर्भ परिसर, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अशा राज्यातील विविध भागात ‘भाजप नंबर एक’चा पक्ष म्हणून पुढे येईल.