तरुण भारत लाईव्ह ।९ सप्टेंबर २०२३। गोकुळ अष्टमीनंतर सक्रिय झालेला पाऊस राज्यभर मनसोक्त बरसत आहे. खरिपातील कोमेजून गेलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होत असून भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
१४ सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा पाऊस वाढेल असा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्येही रिमझीम पाऊस पडत आहे. कोयना धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. विदर्भातही पाऊस सुरु असून वेळीच पाऊस असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. दरम्यान हवामान खात्याने आणखीन दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून १७ सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासात राज्यात यलो अलर्ट दिला असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.