जळगाव । फेब्रुवारीचा महिना सुरु होताच महाराष्ट्रात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळं राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठं कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचं दिसून आलंय. आज (ता. ६) महाराष्ट्र राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पण चार दिवसांनी पुन्हा गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
राज्यातील किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ झाली. सोमवारी अकोला येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सियस तापमान होते. जळगावात कमाल तापमान ३३.६ तर किमान तापमान १५ अंश सेल्सियसवर गेला. रात्री आणि पहाटचा थंडीचा कडाका कमी झाला असून दुपारच्या वेळेस उन्हाचे चटके बसत आहे.
आगामी तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र काश्मीरमधील बर्फवृष्टी व उत्तर भारतात पुन्हा पश्चिमी चक्रवात येण्याचा अंदाज असल्याने चार दिवसांनी पुन्हा १२ फेब्रुवारीपर्यंत गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे.