राज्यातील विदयार्थ्यांसाठी प.न.लुंकड कन्या शाळेचा अनोखा उपक्रम

तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प.न.लुंकड कन्याशाळेतील उपशिक्षक श्री.प्रवीण धनगर यांच्या संकल्पनेतून मराठी,हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचे व्याकरणाचे एकत्रित तुलनात्मक पुस्तक तयार करण्यात आले आहे.   व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे, व्याकरणाला भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हटल जात.

याच व्याकरणाचा अभ्यास सहज,सोपा व सुलभ व्हावा या उद्देशाने मराठी, हिंदी व इंग्रजी व्याकरणाचे एकत्रित पुस्तक शाळेतील व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी पडेल. व्याकरणात बरेच घटक एकसारखे आहेत,हे सर्व घटक भाषेनुसार एकाच पानावर घेऊन तो अधिक सोपा करण्याचा प्रयत्न श्री.प्रवीण धनगर यांनी केला आहे. व्याकरण पुस्तक निर्मितीत शाळेतील इयत्ता 7 वी व 8 वी च्या 11 विद्यार्थीनींचा ही सहभाग घेतला आहे. या उपक्रमातून विद्यार्थीनींना नवनिर्मितीची संधी शाळेने उपलब्ध करून दिली.

सदर व्याकरण पुस्तिकेतील प्रस्ताविकेचे लेखन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष  ॲड.मा.श्री. सुशील अ.अत्रे यांनी केले असून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती नेवे यांनी भाषा व व्याकरणाचे महत्त्व आपल्या अभिप्रायातून व्यक्त केले आहे. मराठी,हिंदी व इंग्रजी एकत्रित व्याकरण पुस्तकाचे प्रकाशन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.मा.श्री. सुशील अत्रे साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आले. सदर प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त मा.सौ.पद्मजा अत्रे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.स्वाती नेवे मॅडम, कै.ॲड.अ.वा.अत्रे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मा.सौ.प्रीती झारे मॅडम,सकाळ विभाग प्रमुख श्री.अनिल सैंदाणे सर, दुपार विभाग प्रमुख सौ.वंदना तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

श्री.प्रवीण धनगर यांनी राबवलेले इतर उपक्रम
याआधीही श्री.प्रवीण धनगर यांनी विद्यार्थीनींसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत त्यात सातवी च्या कवितांची ऑडीओ सी.डी. राष्ट्ररत्न ॲप बालसाहित्य  क्यू.आर.कोड. ग्रंथालय आपल्या दारी सहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित कोण होणार ज्ञानपती, शिक्षकांसाठी संगणक  कॅटलॉग निर्मिती. संगणक निकाल पत्रक सॉफ्टवेयर असे विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत.

सदर व्याकरण पुस्तक हे सर्व विदयार्थ्यांसाठी उपयुक्त असून ते मोफत पी.डी.एफ स्वरूपात दिले जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत छापील पुस्तक मिळावे यासाठी पुस्तक छपाई खर्च संस्था मंजूर करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार असे कार्याध्यक्ष मा.श्री.सुशील अत्रे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील व जिल्हातील इतर विद्यार्थ्यांना हे पुस्तक मोफत मिळावे यासाठीचा खर्च शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री.दिपक आर्डे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ करणार असे त्यांनी आज जाहीर केले.

सदर कार्यक्रमात व्याकरणाचे महत्त्व, तुलनात्मक व्याकरण अभ्यासण्याचे फायदे या विषयीची बहुमोल मार्गदर्शन शि.प्र.मंडळाचे कार्याध्यक्ष मा.सुशील अत्रे यांनी विद्यार्थीनींना केले. पुस्तकाविषयीचे मनोगत श्री.प्रवीण धनगर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. वैभव देसाई सर यांनी कले. शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य, विश्वस्त व समन्वयक यांनी पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थीनींना याचा नक्की उपयोगी होईल अशी भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.