राज्यातील सरकारची कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगार वाढणार; वेतनात थकबाकीही मिळणार

मुंबई: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होणार आहे. याचा शासन निर्णय जारी झाला असून, ही वाढ जुलै ते ऑक्टोबर, २०२३ या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनात मिळणार आहे.

महागाई भत्ता वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान एक हजार रुपये, तर अधिकाऱ्यांच्या पगारात किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर २०० कोटींचा बोजा पडणार आहे.

केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलैपासून ४ टक्क्यांची वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली होती. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलैपासून ४२ टक्क्यांवरून ४६% करण्यात आला आहे.

निवृत्तिवेतनधारकांनाही लाभ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर १ जुलैपासून चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे.

ही वाढ १ जुलै, २०२३ पासूनच्या थकबाकीसह माहे नोव्हेंबर २०२३च्या निवृत्तिवेतन व कुटुंब निवृत्तिवेतनासोबत देण्यात येणार आहे.

तसेच ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी-कृषितेर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.