राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सातव्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी मिळणार
मुंबई । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत शासनाने आज म्हणजेच बुधवारी शासन निर्णय प्रसिध्द केला आहे
या शासन निर्णयात म्हटले आहे की, सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना दि. 01 जुलै 2022 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि सेवानिवृत्तीच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम यथास्थिती भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी तर सेवानिवृत्ती धारकांना रोखीने अदा करण्यात यावी.
तसेच जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थामधील पात्र कर्मचा-यांच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. जे कर्मचारी सेवानिवृत्त अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचा-यांच्या वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरित हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.
याबाबतचा राज्य शासनाने शासन निर्णय आज दि. 24 मे 2023 रोजी प्रसिध्द केला आहे. त्यामुळे शासकीय तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या मोठा अर्थिक लाभ मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.