मुंबई : मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाच्या गणेशोत्सवाबद्दल चर्चा केली. या बैठकीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गिरगावमध्ये पहिला गणेशोत्सव आयोजित करणाऱ्या व्यक्तीचा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात यावा, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच गणेश मंडळांचा उत्साह वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. यावर्षीच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील नागरिकांना घरबसल्या विविध गणेश मंडळाच्या गणपतींचे दर्शन व त्यांच्या सजावटीचा आनंद घेता यावा हा या स्पर्धेचा हेतू आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाची छायाचित्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत. तसेच सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची सविस्तर माहिती आणि गणेशाची पूजा-अर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी आकाशवाणीवर ३० मिनिटांचा विशेष कार्यक्रम करण्यात यावा, अशा सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत [email protected] या ई-मेलवर अर्ज पाठवावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे अर्जदार मंडळे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबर पर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळाचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील.
जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करतील. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करतील. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळाची घोषणा करुन १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळाला पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशमंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
प्रथम पारितोषिक : लाख रुपये व प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक : लाख ५० हजार रुपये व प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक : १ लाख रुपये व प्रमाणपत्र
तसेच जिल्ह्यातील एका उत्कृष्ट गणेश मंडळाला २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेत पुरस्कार प्राप्त गणेश मंडळांना मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाचे पासेस देण्यात येतील.