राज्यात पावसाचा नव्हे ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

पुणे : संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतांना हवामान खात्याने राज्यात कुठे कुठे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे? याचा अंदाज गेल्या आठवड्यात वर्तविला होता. आता हवामान खात्याने नवा अंदाज वर्तविला आहे मात्र हा मान्सून किंवा मान्सूनपूर्व पावसाचा नसून तीव्र उष्णतेच्या लाटेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या ३ दिवसांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

१९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत व अरबी समुद्रातील दाखल झाला असून आता तो लवकरच केरळ आणि महाराष्ट्रात दाखल होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून पुढे सरकला असल्यामुळे आज बहुतांश जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा पहायला मिळेल.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूरमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारा नजीक असणार्‍या मुंबई, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळेही उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.

महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा हा वेग पाहता १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.