तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। गेल्या दोन महिन्यात पाऊस चांगला झालेला नाही. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे या महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. पण कालपासून पावसाने पुन्हा दांडी मारली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली पण पुन्हा पाऊस एक किंवा २ दिवस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात आज आणि उद्या पाऊस होणार नाही परंतु बुधवारपासून पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुरेसा पाऊस होत नसल्याने शेती पिके कोमेजून गेली आहेत. तर काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.