राज्यावरील अवकाळीचं संकट कायम ; IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट जारी, जळगावात काय आहे अंदाज?

जळगाव । राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. राज्यात 13 ते 15 एप्रिल या तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, हवामान विभागानं आगामी दोन तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय.

येत्या ४८ तासांत कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

जळगावात आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज १३ एप्रिल जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर १४ एप्रिल रोजी काही अंशी ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची स्थिती, १५ एप्रिल ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, १६ एप्रिल रोजी काही अंशी कोरडे वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता, १७ एप्रिल काही अंशी कोरडे वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता आहे.