राज्यासाठी पुढचे ४८ तास धोक्याचे, असा आहे हवामान खात्याचा इशारा

मुंबई : काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले आहे. आता महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढच्या ४८ तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भात पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर पहायला मिळेल. तर यावेळी उकाडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. याआधीच रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी गारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा दिलासा आहे.

दरम्यान, देशातल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सध्या चक्रवातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या इशार्‍यानुसार, पुढील ३-४ तासांत राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांवर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये हलक्या पावसाचे रुपांतर मध्यम पावसात होण्याची दाट शक्यता आहे.