चंदीगड : हरियाणातील नुहमध्ये गोहत्येची घटना घडली आहे. येथे एका शेतात गायीची हत्या करण्यात आली आहे. नुहमधील बिछौर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना दोन जिवंत आणि एक हत्या केलेली गाय आढळून आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिछौर पोलीस स्टेशन परिसरात काही लोक रात्रीच्या वेळी शेतात गायी आणून त्यांची कत्तल करतात. याबद्दलची माहिती नुह पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळी छापा टाकत एका आरोपीला अटक केली आहे. हसन मोहम्मद उर्फ हस्सा असे आरोपीचे नाव आहे.
याठिकाणी एका गायीचे पाय बांधून तिची मान कापण्यात आली होती. पोलिसांनी हसन मोहम्मदकडून दोन गायी जप्त केल्या आहेत. यावेळी तिथे इतर गोवंश तस्करदेखील उपस्थित होते. परंतू, त्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. हसन मोहम्मद हा गुरांची कत्तल करून त्यांचे मांस विकत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हसन मोहम्मदसह सर्व आरोपींवर गोवंश कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, इथे अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर नूहमध्ये दररोज रात्री मोठ्या प्रमाणात गायींची कत्तल करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.