रामदेववाडी अपघातप्रकरणात राजकीय दबाव; एकनाथ खडसेंनाचा आरोप

जळगाव : रामदेववाडी अपघातप्रकरणात राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी  केला आहे. त्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांची भेट घेतली त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

काय म्हणाले आहेत एकनाथ खडसे ?
जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी अपघातात चार जण ठार झाले आहेत. मात्र या अपघातात कारचालक आणि त्यात बसलेली मुले ही मोठ्या नेत्यांची मुले असल्याने या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास हा समाधानकारक नाही. पोलीस कोणाच्या तरी दबावखाली असून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारगटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा आरोपी असल्याने राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या सगळ्या प्रकरणात ज्या पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला आहे. त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या घटनेत अजून आरोपी आहेत ते पोलिसांनी निष्पन्न करावे. अपघाताचा घटनेनंतर पोलिसांनी १७ दिवसांपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्र्यांपासून ते पोलीस अधीक्षकांकडे स्वतः पत्र देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र ही कारवाई फारशी समाधानकारक झाली नाही. आरोपींना रुग्णालयात भरती केल्याचे सांगण्यात आले. मात्र 17 दिवस त्यांना दवाखान्यात ठेवण्यात आले, अशी त्यांची परिस्थिती नव्हती. पोलीस राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवत असल्याचं चित्र आहे.

यात आरोपींच्या वडिलांचे जिल्ह्यातील एका मंत्र्यांशी संबंध आहेत. तर दुसरा मुलगा हा राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा असल्याने या प्रकरणावर राजकीय दबाव असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी  केला आहे.