रामदेववाडी चौघांचे बळी प्रकरण; दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : रामदेववाडी येथील चौघांच्या बळी प्रकरणातील आरोपींना आज शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायाधीश वसीम देशमुख यांच्या न्यायालयासमोर आज कामकाज झालं. सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयात युक्तिवाद झाला. दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अर्णव कौल व अखिलेश पवार असे दोघा आरोपींचे नाव आहे. आता या दोघांना २७ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रामदेववाडी (ता.जळगाव) येथील रहिवासी असलेल्या चौघांना ७ मे रोजी आरोपी अर्णव कौल व अखिलेश पवार यांनी भरधाव कारने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान, तब्बल १७ दिवस उलटून देखील या तरूणांवर कारवाई न झाल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, या दुर्घटनेत कारमधील अर्णव कौल व अखिलेश पवार या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गुरुवार, २३ रोजी जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. आज शुक्रवारी दुपारी या दोघांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

या दोन्ही संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ प्रकाश पाटील, अकिल ईस्माईल, सागर चित्रे यांनी बाजू मांडली. त्यांनी आपल्या युक्तीवादात अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांच्या सोबत कारमध्ये अजून दोन जण असल्याकडे लक्ष वेधतांनाच या दोघांनी कार चालविल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणात कलम-३०४ न लावता कलम-२७९ लावावे असा युक्तीवाद देखील केला.

दरम्यान, सरकारी वकील स्वाती निकम यांनी हा युक्तीवाद खोडून काढतानाच या प्रकरणातील गांभीर्य हे न्यायाधिशांच्या लक्षात आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कोण आहेत आरोपी
तीन दिवसाचे पोलीस कोठडीत तिसरा क्रमांकाचे आरोपीचा शोध तसेच चौथा आरोपी कोण त्याबाबतची माहिती याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही त्यामुळे तो अहवाल आल्यानंतर त्यात काय समोर येतं ते पहाणे महत्त्वाचे असेल. रक्ताच्या नमुनांचा अहवाल आल्यानंतरच आरोपी त्यादिवशी नशेत होते की नव्हते या गोष्टीचा उलगडा होईल. त्यामुळे या सर्व बाबींकडे आता लक्ष लागले आहे.