राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? महत्त्वाचे अपडेट्स

नवी दिल्ली : राम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याबाबत जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. राम मंदिराचे संपूर्ण काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. यातच आता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना कधी होणार, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा प्रतिष्ठापना सोहळा तब्बल १० दिवस चालणार आहे. यानंतर भाविकांना दर्शनासाठी पहिला टप्पा खुला केला जाईल, असे सांगितले जात आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

अयोध्येत बांधल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मकर संक्रांती कालावधीत केली जाणार आहे. १५ जानेवारी २०२४ रोजी हा सोहळा सुरू होईल आणि २४ जानेवारी २०२४ पर्यंत हा सोहळा सुरू राहील. या काळात अनेकविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण पाठवले जाणार आहे, अशी माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.