राम मंदिरावरुन राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका; भाजप नव्हे, कॉग्रेस नेत्याने दिले जबरदस्त प्रतिउत्तर

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असतांना दुसरीकडे त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच दरम्यान उध्दव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. मात्र या टीकेला भाजपाने नव्हे तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय अयोध्येत हलवावे. कारण हे सरकार अयोध्येतूनच चालेल. हे लोक आगामी काळात रामाच्या नावाने लोकांची मते मागतील. कधी पुलवामासारखा हल्ला घडवून आणतील तर कधी आमच्यापेक्षा मोठा रामभक्त कोणीही नाही, असे म्हणतील. राम मंदिरासाठी आम्ही, आमच्या पक्षाने आणि आमच्या लोकांनी सगळे काही दिले आहे. प्रसंगी रक्त सांडले आहे. पण आम्ही कधी असले राजकारण केले नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

याला काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रभू श्रीरामांचा विरोध करणारे हे लोक नास्तिक आहेत. त्यांना भारताच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. अशी टीका होणे आपल्या देशाचे मोठे दुर्दैव आहे. लोकशाहीत असे काही होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करा, त्यांच्या निर्णयांचा निषेध नोंदवा. परंतु, त्यांचा तिरस्कार करू नका. काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यात स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. विरोधी पक्षतील काही नेते असे आहेत ज्यांनी स्वतःचे सरकार पाडले आहे. हा स्वतःचा सत्यानाशच आहे. ही मोठी नारात्मकता आहे, असे प्रमोद कृष्णम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

श्रीरामांचा विरोध करायचा आणि भारतात राजकारण करायचे, हे वाईट आहे. अशा राजकारण्यांमुळे भारतातील जनतेला दुःख होते. आता राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हा भारताचा उत्सव आहे. या उत्सव काळात नकारात्मकतेला थारा असू नये. ही आपली संस्कृती नाही, असे आचार्य म्हणाले.