नंदुरबार : अयोध्येत उद्या होणाऱ्या श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला सकल हिंदू समाजातर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित , खासदार डॉ. हिना गावित , भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी ,शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी , जिल्हा प्रमुख ऍड.राम रघुवंशी, माजी नगरसेवक किरण रघुवंशी , दिपक दिघे , यशवर्धन रघुवंशी ,के. आर. पब्लिक स्कुलचे चेअरमन किशोरभाई वाणी, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी , हिंदू जनसेवक केतन रघुवंशी यांच्यासह शहरातील असंख्य राजकीय नेते , व्यापारी , रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान सहभागी प्रत्येकाचा उत्साह, श्रीरामाचा जयघोषामुळे नंदनगरी दुमदुमली होती.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येला आज शहरातून सकल हिंदू समाजातर्फे शहरातील मुख्य मार्गावरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात महिला,युवतींचा सहभाग लक्षणीय होता. श्रीरामाचा भक्ती गीतांवर तरूणाई थिरकली होती. श्रीरामाचा जयघोष करीत शहरातून ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात श्रीराम व सिता मातेचा सजीव देखावा तयार करून रथावर विजराजमान केले होते. या रॅलीत राजकिय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही रॅली सी बी पेट्रोल पंपजवळील मोदी मैदानात दुपारी चारपासूनच महिला, युवती , युवकांसह नागरिकांची हजारोच्या संख्येने मोटारसायकलींसह गर्दी झाली होती. डि.जे.च्या तालावर त्याठिकाणी श्रीरामाचा जयघोष करीत अनेकांनी ठेका धरला होता.
याठिकाणी शिवसेनेचे धुळे-नंदुरबार जिल्हा प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख राम रघुवंशी,भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट, हाट दरवाजा ,गणपती मंदीर, जळका बाजार मार्गे मोठा मारूतीजवळ आली. याठिकाणी खासदार डॉ. हिना गावित, मंत्री डॉ. विजयकुमार गावित, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. तेथून मोटारसायकल रॅली नेहरू चौकात गेली. त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह डि जे च्या तालावर अनेकांनी ठेका धरत नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला .त्यानंतर रघुवंशी कुटुंबाच्या श्रीराम मंदीरात सायंकाळी महाआरतीने मोटारसायकल रॅलीचा समारोप झाला.