तरुण भारत लाईव्ह । रायगड : स्वराज्याची राजधानी रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्सव सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्ताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं मेघडबरी आकर्षक फुलांनी सजविण्यात आलीय. ठिकठिकाणी भगवे झेंडे, विद्युत रोषणाई करण्यात आलीय. छत्रपती संभाजीराजे, शहाजीराजे, संयोगिता राजे गडावर उपस्थित आहेत. ३५० व्या राज्याभिषेक निमित्ताने मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
६ जून १६७४ रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज ६ जून रोजी तारखेनुसार ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. रायगडावर आज होणार्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी झाली आहे.
त्यामुळे किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प आहेत. महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प आहे. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवलीय. त्यामुळे शिवप्रेमींची वाहनं परतीच्या मार्गावर आहेत. सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याने शिवप्रेमी नाराज आहेत.
‘दुर्गराज रायगडवर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली साधारण ५० ते ७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये,’ असं आवाहन संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. कृपया सर्वांनी सहकार्य करावे,’ असं संभाजीराजे म्हणाले.