मुंबई/जळगाव । आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून लोकसभेच्या जागावाटपावरून राज्यात रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून यामुळे एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्याने जागावाटपाचा तिढा आणखीच वाढला आहे. राज्यात लोकसभेसाठी कोणता पक्ष किती जागा लढणार याबाबत अद्यापही स्पष्ट झालं नसल्याचं तरी महायुती आणि महाआघाडीतील पक्षांनी जागा वाटपाच्या वाटाघाटी देखील सुरू केल्या आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादीचा शरद पवार गट राज्यातील १४ ते १५ जागा लढवणार असून यात जळगाव जिल्ह्यातील रावेर या जागेवर पक्षाने दावा दाखल केल्याचे जयंत पाटील यांनी सूतोवाच केले आहे. याआधी अजित पवार यांनी आपला पक्ष बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चार जागा लढवणार असून यासोबत अन्य जागांबाबत सहकारी पक्षासोबत बोलू असे त्यांनी काल कर्जत येथील शिबिरात सांगितले.
यानंतर आज जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य करत आम्ही आधी जिंकलेल्या सर्व जागा तर लढवणारच आहोत, पण अन्य जागांवरही उमेदवार उभे करणार आहोत. यात त्यांनी अमरावती, भंडारा, दिंडोरी, रावेर आदी जागांचा उल्लेख जयंत पाटील यांनी केला.
जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर २०१९ साली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे उमेदवार मैदानात होते. यातील रावेरचा विचार केला असता २००९ आणि २०१४ या दोन निवडणुकीत राष्ट्रवादीने तर २०१९ मध्ये कॉंग्रेसने येथून निवडणूक लढविली. मात्र या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपने विजय संपादन केला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीत रावेरमधून कॉंग्रेसच जागा लढविणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. यानंतर मात्र आज जयंत पाटील यांनी या जागेवर दावा केला आहे. यामुळे आता रावेरवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, जळगावाची जागा नेमकी कोण लढविणार ? याची उत्सुकता देखील निर्माण झाली आहे