राष्ट्रवादीची होणार सलग सुनावणी?

मुंबई : सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती. 20 तारखेनंतर सलग सुनावणी होणार आहे. काही तांत्रिक गोष्टी आम्ही कोर्टासमोर आणणार आहोत. त्यावर कोर्ट सुनावणी करतील. अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. गेल्या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात होता.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सलग दोन तास युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती दिली. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “निवडणूक आयोगात जवळपास दीड तास सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत आम्ही पहिल्यांदा युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी आम्ही अनेक धक्कादायक, आश्चर्यकारण आणि अजब गोष्टींमागचे तथ्य निवडणूक आयोगासमोर मांडले. याचिकाकर्त्यांनी जे मुख्य दस्ताऐवज निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी आम्ही २० हजार असे प्रतिज्ञापत्र शोधून काढले आहेत, त्यापैकी ८९०० प्रतिज्ञापत्रांचा चार्ट बनवून निवडणूक आयोगाला दिला.” अशी माहिती त्यांनी दिली.