राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होतील, अजितदादा म्हणाले…

तरुण भारत लाईव्ह । नाशिक : राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण? यावरुन महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवार यांचे नाव सातत्याने पुढे केले जात असल्याने ठाकरे गट व काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री कोण? या विषयावर राज्यात चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे, पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकित विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघडीच्या काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्यात नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं भाष्य केलं. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं.

नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या भाष्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. अमुक एक मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वक्ते बोलले, पण भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी १४५ आमदारांचे संख्याबळ पाहिजे. तसंच महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढवणार असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.