सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याला चाटर्ड विमान पाठवले होते. बुधवारी सकाळी ते खास विमानाने सहपरिवार पुण्याहून हैदराबादकडे रवाना झाले. त्यामुळे ते लवकरच चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरते, यावर बरंच काही अवलंबून आहे. खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता.
दरम्यान, भालके चार्टर्ड विमानाने आज, सकाळी हैदराबादला रवाना झाले. त्यांच्यासमवेत आई जयश्री भालके, पत्नी प्रणिता भालके, भाऊ व्यंकट भालके, रूद्रतेज भालके, शौर्यतेज भालके यांच्यासह माजी आमदार शंकर धोंगडे, मारूती जाधव आदीजण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.