राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र?

मुंबई : शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी नुकतीच अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र आहेत का? यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान, अजित पवार गटाने शरद पवार गटातील सर्व खासदारांची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी लोकसभेला आणि राज्यसभेला पत्र दिले आहे. या पत्रातून अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यानंतर अमोल कोल्हेंनी अजित पवारांची घेतलेली भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे.
याविषयी अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, “शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे दोन प्रोजेक्ट आहेत. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आणि इंद्रायनी मेडिसिटी प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. याचा आणि इतर विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी ही भेट घेतली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.