राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची… प्रफुल पटेल काय म्हणाले?

मुंबई : राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली असून खरा पक्ष कुणाचा याबाबत वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून पक्षाच्या प्रतिनिधीत्वावर दावा सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी एक वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटाला जास्तीत जास्त निवडून आलेल्या प्रतिनिधींचा पाठिंबा आहे, याआधारे निवडणूक आयोग कोणता गट पक्षाचे प्रतिनिधीत्व करणार याबाबतचा निर्णय घेऊ शकतो, कारण ३० जूनपूर्वी झालेल्या नियुक्त्या या पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार नाहीत, असे प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
तसेच एकनाथ शिंदे आणि आमची केस पुर्णपणे वेगळी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत. आमच्या केसमध्ये तसे काहीच नाही. राष्ट्रवादीची केस पूर्ण वेगळी असून त्याचा आणि शिंदेंच्या केसमध्ये काडीमात्र संबंध नाही असेही ते म्हणाले.