राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज सोमवार, १९ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपांकर दत्ता आणि के. व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली.
दरम्यान, याचिकाकर्ता शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याचा अधिकार देणारा निवडणूक आयोगाचा ७ फेब्रुवारीचा आदेश पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
तसेच शरद पवार गट चिन्हासाठी निवडणूक आयोगात जाऊ शकतो आणि अर्ज केल्यानंतर एक आठवड्याच्या आत चिन्हाचे वाटप केले जावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.