“राष्ट्रवादी हा पक्ष एकच, कुठलीही फूट नाही” जयंत पाटलांच्या गुगलीने भुवया उंचावल्या!

नागपूर : “राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादी हा पक्ष एकच असल्याचे मानतो. त्यामुळे आमच्यात फूट पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोगातही आम्ही हेच म्हटले आहे.”, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे (पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशी भूमिका मांडली आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटांना एकच कार्यालय देण्यासंदर्भात प्रश्न विचारला असताना जयंत पाटील यांनी हे उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे नागपूर विधीमंडळातील राष्ट्रवादीचे कार्यालय हे अजित पवार गटाला देण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “मूळ पक्ष आमचाच आहे. त्यामुळे त्या कार्यालयाची मागणी करण्याचा प्रश्न येतच नाही. जे कार्यालय आमचेच आहे. त्यामुळे आम्ही ते कुणाला देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ज्यांना ते कार्यालय हवं आहे त्यांनी तशी मागणी केली असावी. आमचा पक्ष हा ओरिजनलच आहे. आमच्यातून कुणी बाहेर गेलं आणि त्याला विधानसभा अध्यक्षांनी त्याला स्वीकारलं असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे जिथे अपात्रतेची सुनावणी सुरू आहे, त्यावेळेसच अशाप्रकारचा निर्णय देणे हे पूर्वन्याय कृती ठरेल.”

“त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. आमचाच पक्ष आणि आमच्याच पक्षाचं ते कार्यालय आहे. मला माहिती नाही. पण ज्यांनी अर्ज केला मला माहिती नाही कुणी अर्ज केला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी जर अशाप्रकारे निर्णय घेतला असेल तर निकाल येण्यापूर्वी केलेली ही कृती आहे.”, असेही ते म्हणाले. व्हीप संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, “आम्ही कुठल्याही प्रकारे व्हीप जारी केलेला नाही. कारण तशी स्थिती अद्यापही आलेली नाही. निवडणूक आयोगापुढे जेव्हा भूमिका मांडण्याची वेळ आली त्यावेळी आम्ही आमचा पक्ष एकच आहे, असेच स्पष्ट केले आहे. ज्यांनी निवडणूक आयोगात अर्ज देऊन त्यांचं म्हणणं मांडलं आहे, त्यांनी पवारांविरोधात कुठल्याही प्रकारचा अर्ज किंवा पक्षविरोधी कारवाई यापूर्वी केलेले नाही. अचानक तिथे अर्ज गेल्याने त्याची सुनावणी तिथे सुरू आहे.”

“जर का अजित पवार त्या कार्यालयात आले तर आम्ही त्यांना बसू नका, असं तर म्हणणार नाही. आमचाच पक्ष मूळ आहे. आम्हाला सोडून कुणी गेलं, असं आम्ही मानतच नाही. अध्यक्षांकडे जी अपात्रते प्रकरणी सुनावणी सुरू आहे. ते तिथे सुरू आहे. अर्थात काही नेत्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली हा विरोधाभास तर आहेच ना त्यावर सुनावणी सुरू आहेच. बघू तिथे काय होईल.”, असेही ते म्हणाले.